पीएमसी बँक घोटाळा: माजी संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

विविध आजारांनी ग्रस्त असल्याने कोरोनाच्या धोक्यामुळे अंतरिम जामीन द्यावा, अशा विनंती जसविंदर सिंगने न्यायालयाकडं केली होती.

पीएमसी बँक घोटाळा: माजी संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

 पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी जसविंदर सिंग बनवैत याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. विविध आजारांनी ग्रस्त असल्याने कोरोनाच्या धोक्यामुळे अंतरिम जामीन द्यावा, अशा विनंती जसविंदर सिंगने न्यायालयाकडं केली होती.  घोटाळ्यावेळी जसविंदर सिंग बँकेचा संचालक होता. पीएमसी बँकेतील 4 हजार 355 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात जसविंदर आरोपी आहे. 

नियमबाह्य कर्जे मंजूर झाली तेव्हा जसविंदर हा बँकेच्या कर्ज व गुंतवणूक समितीचा सदस्य होता. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १२ मार्च रोजी त्याला विश्वनाथ प्रभू व श्रीपाद गोविंद यांच्यासोबत अटक केली होती. जसविंदर सिंग सध्या तळोजा तुरुंगात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसविंदर सिंगने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. 

 मी मधुमेही व अन्य आजारांनी ग्रस्त असून मला तुरुंग प्रशासनाकडून मागणीप्रमाणे औषधेही पुरवली जात नाहीत. त्यामुळे सध्याच्या करोना संसर्गाच्या संकटात धोका असल्याने मला अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती जसविंदरने अर्जात केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याच्या प्रकृतीविषयीचा अहवाल मागवला होता. त्याप्रमाणे तळोजा तुरुंगाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारी वकील श्रीकांत गावंड यांच्यामार्फत न्या. साधना जाधव यांच्यासमोर अहवाल सादर केला.

आरोपीला दम्याचा त्रास आहे. मधुमेह असल्याचेही त्याने सांगितले आहे. याविषयी आवश्यक ती औषधे आरोपीला देण्यात येत आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा संबंधित सर्व आरोपींना पोषक आहारही दिला जात आहे. आरोपीची प्रकृती सध्या ठीक व समाधानकारक आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे वैद्यकीय अहवाल पाहता अर्ज फेटाळण्यात येत आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने अर्जदाराला आवश्यक औषधे व आहार देत राहावे,'असे न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात स्पष्ट केले.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा