Advertisement

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

कोरोनामुळं आगामी गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असताना गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीओपीवर बंदी घालण्यात आली आहे.

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला असून त्यांच्या फटका आता आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सवावर बसण्याची शक्यता आहे. कोरोनामुळं आगामी गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असताना गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीओपीवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व देव-देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत (मार्गदर्शक तत्त्वे) हे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या नियमावलीनुसार, मूर्तिकारच नव्हे तर, सार्वजनिक मंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठीही नियमावली आहे. गणेशोत्सव केवळ ३ महिन्यांवर येऊन ठेपला असताना, किमान या वर्षासाठी या नियमावलीतून सुटका व्हावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर काही वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक उत्सवाच्या अनुषंगानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. अनेक बैठकांनंतर २०१०मध्ये 'मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे' जाहीर करण्यात आली. यामध्ये प्लास्टिकचा वापर तसेच मूर्तीच्या उंचीवर निर्बंध यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले होते. मात्र मागील काही वर्षांत उत्सवासंबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्यानं बुधवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली.

यानुसार, केवळ नैसर्गिक, जैव-विघटनक्षम, पर्यावरणास अनुकूल कच्च्या मालापासून बनवलेल्या मूर्तीनाच परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीच्या दागिन्यांसाठी केवळ वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादीचा वापर करता येणार आहे. मंडप उभारणी, सजावट आदी कामांसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मंडळांनी कमी उंचीची आणि मातीच्या किंवा मका, पालक, गहू आदी पर्यावरणास अनुकूल पदार्थांपासून बनवलेल्या मूर्ती स्थापित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सजावटीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा. प्रसादासाठी विघटनशील पत्रावळी किंवा द्रोणाचा वापर करावा, तसंच मंडळांनी केवळ नोंदणीकृत मूर्तिकारांकडून मूर्ती घ्याव्यात अशा अनेक सूचना यात आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जाहीर केलेल्या नियमावलीमुळे सार्वजनिक मंडळे, मूर्तिकारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाच्या सूचनेनंतर गतवर्षी प्लास्टिक तसेच थर्माकोलच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. यंदा पीओपीच काय, शाडूची माती देखील मूर्तिकारांना उपलब्ध झालेली नाही. गणेशोत्सव अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यावर्षी केंद्राच्या नियमावलीतून सवलत देण्याची मागणी करणार असल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

समुद्रात मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी केवळ ओहोटीच्या वेळीच परवानगी देण्यात यावी, तसंच विसर्जनासाठी राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच, स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीनं उत्सव कालावधीत आणि त्यानंतर पाण्याची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३ टप्प्यांत ही चाचणी करायची आहे. विसर्जन करताना हार, फुले, डेकोरेशनचे साहित्य काढण्याची सूचना करण्यात आली आहे.



हेही वाचा -

पुढचे ५ दिवस मिरा-भाईंदर पूर्णपणे बंद!

Coronavirus Updates: कल्याण-डोंबिवलीतील कंटेन्मेंट झोनची पूर्ण लिस्ट! बघितली नसेल, तर आताच बघा...



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा