दिग्दर्शक रेमो डिसुझाला धमकी: पुजारी टोळीच्या हस्तकाला अटक

पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने रेमोला धमकावणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचा विश्वासू कमल सिंग राजपूत ऊर्फ कमरुद्दीन पटेलला बुधवारी अटक केली. पटेलच्या चौकशीत त्याला निर्माता सत्येंद्र त्यागीने रेमोला धमकावण्यासाठी मदत केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

दिग्दर्शक रेमो डिसुझाला धमकी: पुजारी टोळीच्या हस्तकाला अटक
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला एका सिनेमातील व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून गँगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने रेमोला धमकावणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचा विश्वासू कमल सिंग राजपूत ऊर्फ कमरुद्दीन पटेलला बुधवारी अटक केली. पटेलच्या चौकशीत त्याला निर्माता सत्येंद्र त्यागीने रेमोला धमकावण्यासाठी मदत केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.


काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि त्यागी एकत्र येऊन 'डेथ ऑफ अमर' हा सिनेमा बनवत होते. राजीव खंडेलवाल या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार होता. या सिनेमाचं काम आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादामुळे अडकलं. त्यागीने या सिनेमात ५ कोटी रुपये गुंतवले होते. त्यामुळे विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यागी रेमोकडून त्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' मागत होता.

परंतु रेमो त्यासाठी नकार देत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. अखेर त्यागीने गँगस्टर रवी पुजारीच्या मदचीने रेमो डिसुझाला खंडणीसाठी धमकावण्याची सुपारी दिली. त्यानुसार पुजारीने ५० लाख रुपये रेमोकडे मागत त्यागीची रक्कम त्याला परत करण्यास सांगितली.


स्वत:वर केला गोळीबार

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने या निर्माता सत्येंद्र त्यागीला अटक केली. त्यागीच्या चौकशीतून पटेलचं नाव पुढं आलं होतं. तसंच रेमोला अडकवण्यासाठी त्यागीने स्वतः वरच गोळीबार घडवून आणल्याची माहितीही पुढे आली होती. हा कट रचताना त्यागी पुजारीचा हस्तक कमरुद्दीनलाही भेटला होता, अशी माहिती त्यागीच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर अखेर खंडणी विरोधी पथकाने कमरुद्धीनला अटक केली.


आधीच पोलिसांच्या ताब्यात

एसआरएप्रकरणाचा वाद सोडवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी रवी पुजारीच्या गुंडांसह कमरुद्दीनलाही यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर कमरुद्दीन न्यायालयीन कोठडीत होता. याप्रकरणी देखील गुन्हे शाखा त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता आहे.



हेही वाचा-

रेमो डिसुझाला अडकवण्यासाठी त्यागीने रचला स्वत:च्या हत्येचा कट

गँगस्टर रवी पुजारीकडून रेमो डिसोझाला खंडणीसाठी धमकी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा