लोन घेताना सांभाळून, नाहीतर होऊ शकते फसवणूक!


लोन घेताना सांभाळून, नाहीतर होऊ शकते फसवणूक!
SHARES

कुणाकडूनही लोन अर्थात कर्ज घेताना खबरदारी घ्या. नाहीतर तुमची फसवणूक होईल आणि तुम्हाला कळणारही नाही. होय कारण मुंबईतल्या माटुंग्यात कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी दिल्लीतून पर्दाफाश केला आहे.


यांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी राजेंदर सिंग (३४), सचिन सिरोही (२८), अनुपकुमार अग्रहारी (२५), विक्रांत सिंग(२६), प्रशांत चौधरी(२५) अशी या आरोपींची नाव आहेत. या आरोपींना न्यायालयाने १६ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब काका़ड यांनी दिली आहे.


संपूर्ण प्रकार

माटुंगा परिसरात राहाणारे ६८ वर्षीय तक्रारदार हे निवृत्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना राजेंदरने फोन करून रिलायंस कॅपिटलमधून बोलत असल्याचं सांगून लोन मिळवून देतो, असं सांगितलं. वारंवार तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून राजेंदरने त्यांचा विश्वास संपादन केला.
लोन देण्याच्या नावाखाली राजेंदरने प्रोसेसिंग फी आणि इतर कारणे देत तक्रारदार यांच्याकडून ९३ लाख ५९ हजार विविध खात्यांवर जमा करून घेतले. मात्र तरीही राजेंदर पैसे मागत असल्यानं त्याच्यावर संशय आल्याने तक्रारदाराने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


टोळीने अनेकांना गंडवलं

पोलिस राजेंदरचा माघ काढत दिल्लीपर्यंत पोहचले. त्याठिकाणाहून पोलिसांनी या पाच जणांना अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी २० फोन, १ सीपीयू, २ राऊटर हस्तगत केले आहे. मागील अडिच वर्षांपासून या टोळीने अशा प्रकारे शेकडो जणांना गंडवल्याची माहिती तपासात पुढे अाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे निनावी फोन करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिस उपायुक्त ४ च्या एन. अंबिया यांनी केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा