पत्नीच्या अनैतीक संबधाच्या संशयावरुन मित्राची हत्या


SHARE

पत्नीचे मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना नेहरूनगरमध्ये उघकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला १२ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.


संपूर्ण प्रकार

कुर्लाच्या नेहरूनगर परिसरातील टिळकनगर टर्मिनस यार्डमध्ये गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. दरम्यान मृत व्यक्तीबाबत माहिती घेतली असता त्याचं नाव जगन्नाथ शिंगाडे (२२) असल्याचं पुढे आलं. जगन्नाथ शिंगाडे हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. बुधवारी तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद करत जगन्नाथचा तपास सुरू केला.


एकाचा शोध सुरू

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या परिसरातील काही व्यक्तींकडून माहिती घेतली असता शिंगाडे अखेरचा पांढरेसोबत जाताना दिसला होता. तेव्हा पोलिसांनी अंकुश प्रल्हाद पांढरे (३०) याला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पांढरेने त्याचा काटा काढल्याचं निष्पन्न झाल्याचं उपायुक्त शहाजी उपाम यांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी शिंगाडेचे वडील नामदेव शिंगाडे (५६) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३६४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पांढरेच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या