डीटूएच कंपनीला गंडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


डीटूएच कंपनीला गंडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
SHARES

डीटूएच रिचार्ज करणाऱ्या अॅप्लिकेशनमधील त्रुटीच्या मदतीने खासगी नामांकित कंपनीची ३० लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. महेश जाधव (२८) आणि महेश सोलंकी (३०) अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनी २० हजार बेकायदा व्यवहार करून ही फसवणूक केली असल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.


अशी केली फसवणूक

महेश जाधव आणि महेश सोलंकी हे दोघेही मूळचे गुजराचते रहिवासी आहेत. या दोघांनी अंधेरीतल्या एका नामंकित कंपनीतून अॅप्लिकेशनच्या मदतीने डीटूएच रिचार्जचं कंत्राट घेतलं होतं. खरंतर ही कंपनी कंपनी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईल आणि डीटूएच रिचार्ज सेवा पुरवते. त्यामुळे ही कंपनी, वितरक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसह थेट ग्राहकांना डीटूएच सेवा पुरवते.

व्यापाऱ्यांमार्फत या सेवेचा वापर केल्यास कंपनीला कमिशन वगळून रक्कम मिळते, तर दुसऱ्या सुविधेत ग्राहक स्वतःचं खाते तयार करून ई-वॉलेटच्या माध्यमातून रक्कम देतो. थेट सुविधा देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू असून सध्या सुरू असलेल्या सेवेत या तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. याच गोष्टीचा फायदा घेऊन दोन्ही आरोपींनी या दोन्ही सुविधांमध्ये खातं उघडलं होतं.

या चुकीच्या पद्धतीने आरोपींनी २० हजार ग्राहकांसोबत थेट व्यवहार करण्यास सुरुवात केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना कालांतराने नागरिकांनी काही त्रुटींबाबत तक्रारी केल्यानंतर हा प्रकार कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. हा व्यवहार करून दोन्ही आरोपींनी कंपनीची ३० लाखांची फसवणूक केली.


सायबर पोलिसांकडे तक्रार

याप्रकरणी कंपनीने 14 सप्टेंबरला सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून सायबर पोलिस भावनगरमधील दोन आरोपींपर्यंत पोहोचले. चौकशीत आरोपींनी जुगार आणि घर दुरुस्तीसाठी फसवणुकीची रक्कम वापरल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात अन्य कुणाचा समावेश आहे का? याची चौकशी पोलिस करत असून अधिक तपास सुरू असल्याचं सायबर पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय