अट्टल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, 3 बंदुका, 17 काडतुस जप्त


अट्टल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, 3 बंदुका, 17 काडतुस जप्त
SHARES

मुंबईत विना परवाना शस्त्रांची तस्करी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांना यश आलं आहे. धर्मेश उर्फ डीके पप्पू सिंग (२८) आणि राजेंद्र पाटील (३२) अशी या आरोपींची नावं आहेत. या अटक करण्यात आलेेल्या दोन्ही चोरट्यांकडून ३ बंदुका आणि १७ जिवंत काडतुसांसह १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


सापळा रचून कारवाई

खार पश्चिम परिसरातील एएटी मॉलसमोर २० मे रोजी दोन सराईत आरोपी अवैध शस्त्रांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ बंदुका,१२ जिवंत काडतुस, २ मोबाईल, सोने-चांदीचे दागिने आणि २ लाख १० हजार रुपयांची रोकड असा एकूण १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


दोघांना अटक

जप्त केलेला मुद्देमाल गुजरात राज्यातील बोताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची माहिती धर्मेश ऊर्फ डीके पप्पू सिंग (२८) आणि राजेंद्र पाटील (३२) यांनी दिली. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली.


गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पोलिसांनी धर्मेशच्या राहत्या घराची झडती घेतली असता तेथे आणखी एक बंदूक आणि ५ जिवंत काडतुसा सापडल्या. धर्मेश सिंग हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध नालासोपारा, पालघर येथे खुनाचे गुन्हे तर भिवंडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा 9 चे पोलिस करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा