अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण


अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण
SHARES

गावात चोर शिरल्याच्या नुसत्या अफवेमुळे धुळ्यात जमावाने काही जणांना मारल्याची घटना ताजी असताना आता अशीत एक घटना मुंबईतल्या शिवाजी नगर परिसरात घडली आहे.

शिवाजीनगर परिसरात चोर समजून जमावाने चक्क पोलिसांनाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पोलिस चोराला पकडण्यासाठी शिवाजीनगर परिसरात गेले होते. दरम्यान चोराने पोलिसांना उद्देशून साध्या वेशातील अपहरणकर्ते असल्याचं संबोधल्याने जमावाने पोलिसांनाच मारहाण केली. काही समाजसेवकांच्या मध्यस्थीनंतर हा गुंता सोडवून पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार?

रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणारे आरोपी शिवाजीनगर परिसरात लपल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या आरोपींचा माग काढत वडाळा टीटीचे पोलिस सोमवारी रात्री शिवाजीनगरमधील आहिल्याबाई होळकर मार्गावर पोहचले. त्या दोन्ही आरोपींचा थांगपत्ता लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन निघाले असताना दोन्ही आरोपींचे साथीदारही त्यावेळी तिथे होते. 


आरोपींनी रचला कट

पोलिस पकडून नेहणार या अनुषंगाने त्यांनी डोळ्यांनी इशारे करत पळून जाण्याचा कट रचला. पोलिसांनी जसे त्या दोन्ही आरोपींना घराबाहेर काढताच आरोपींच्या साथीदारांनी साध्या वेशातील अपहरणकर्ते मित्रांना पकडून नेत असल्याची बोंब ठोकली. हे ऐकून जमाव एकवटला. त्यावेळी आरोपींच्या एका मित्राने पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्यानंतर जमावातील काहींनी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

संधी साधून चोरांनी तेथून पळ काढला. त्यावेळी एका पोलिसांनी घडलेला प्रकार पोलिस नियंत्रण कक्षाला सांगितल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांची मदत केली. या घटनेनंतर पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या अहमद शेख आणि रईस शेखवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा