SHARE

मुंबई - टॅक्सी चालकाकडून 4 हजार रुपयांची लाच घेताना वाहतूक पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंध विभागानं अटक केलीय. नामदेव ढोमसे असं या वाहतूक पोलिसाचं नाव असून, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तो चालकाकडून लाच घेत होता. नोटाबंदीनतंर वाहतूक पोलिसांनी ई चलान हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही याची गंभीर दखल घेतलीय. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद घेण्यात आलीय. नागपाडा वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या ढोमसे याने मुंबई सेंट्रलच्या दिशेने जात असलेल्या 42 वर्षीय टॅक्सी चालकाला अडविले. टॅक्सीच्या कागदपत्रांची मागणी करून ढोमसे याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालकावर दादागिरी करून कारवाई करण्याचे कारण देत टॅक्सी ताब्यात घेतली. टॅक्सीच्या फिटनेसची मुदत संपली असून, टॅक्सी परत देण्यासाठी ढोमसे याने या चालकाकडे 10 हजार रुपयांची मागणी केली असल्यानं टॅक्सी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू केलाय. एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून टॅक्सी चालकानं ढोमसे याच्यासोबत तडजोड करण्यास सुरूवात केली. सौदा 4 हजार रूपयाचा झाला. त्यावेळ लाच घेताना ढोमसे यांना रंगेहात पकडण्यात आल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानं सागितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या