अंधेरीत तरूणाला मारहाण

अंधेरी - नगरदास रोड येथील क्लासिक बारच्या बाहेर एका तरुणाला काही लोकं मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पवन कुमार असे या तरुणाचे नाव आहे. आपण पोलिसांसाठी काम करत असल्याचा दावा या तरूणाने केला आहे.

या तरूणाच्या म्हणण्यानुसार आपल्याला क्लासिक हॉटेलच्या मॅनेजरने भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र तिथे जाताच आपल्याला मॅनेजर आणि त्याच्या पाच ते सहा माणसांनी मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये बारच्या वॉचमनचाही समावेश होता. आपल्याला मारहाण करुन खंडणीच्या प्रकरणात अडकवण्याचा हा डाव असल्याचा दावाही पवन कुमारने केला आहे.

मारहाण केल्यानंतर मला ती माणसं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. तिथे मी पोलिसांकडे मदत करण्याची विनंती केली. मात्र मदत करण्याऐवजी आपल्यालाच उलट सुलट प्रश्न विचारण्यात आल्याचं पवन कुमारचं म्हणणं आहे. मी पोलिसांसाठीच काम करत असतानाही मला त्यांनी मदत केली नाही असा आरोप पवन कुमारने केला आहे. 

या सर्व प्रकरणावर अंधेरी पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. यासंदर्भात त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतरच तरूणाला मारहाणीचं खरं कारण काय आहे आणि नक्की प्रकार काय आहे याबाबत खुलासा होऊ शकेल.

Loading Comments