खार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची वाकोला येथील राहत्या घरी चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात तसेच पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गणोरे यांचा 21 वर्षांचा मुलगा आणि घरातील आणखी एक व्यक्ती बेपत्ता असल्याने हत्येचे गूढ आणखीनच वाढले आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे खार पोलीस ठाण्यात कार्यरत असून बहुचर्चीत शीना बोरा हत्याकांडाचा तपास त्याच्याच पोलीस ठाण्यात होत आहे. या तपासाच्या आधारावरच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. ज्ञानेश्वर गणोरे मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यातील काम संपवून घरी गेले. मात्र त्यांच्या पत्नीने दार उघडले नाही. त्यांनी मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही पत्नीकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी स्वत: जवळील चावीने घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यांनी लगेचच 100 नंबरवर फोन करून कंट्रोल रूमला या घटनेची माहिती दिली.
प्राथमिक तपासात ज्ञानेश्वर गणोरे यांचा 21 वर्षांचा मुलगा तसेच घरातील आणखी एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गणोरे यांच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात पाठवला आहे. वाकोला पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
"दि. 24/05/17 रोजी फिर्यादी न्यानेश्वर गणोरे हे रात्री घरी आले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी त्यांच्या पत्नी यांना फोन केला असता फोन बंद लागला. त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना पत्नी दिपाली गणोरे या रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. त्यांनी त्वरित 100 नंबर ला फोन करून माहिती दिली. वाकोला पोलिसांनी गु र क्र 243/17 कलम 302 प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे."
- डीसीपी रश्मी करंदीकर प्रवक्त्या मुंबई पोलीस
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या हत्येप्रकारणी आता आणखी एक खुलासा झाला आहे. ज्या व्यक्तिने दीपाली गणोरे यांची हत्या केली त्यानेच दीपाली यांच्या रक्ताने जमिनीवर एक नोट लिहली आहे. "Tired of her, catch me and hang me " या वाक्यानंतर हत्या करणाऱ्या नाराधमाने स्माइली देखील काढला आहे. या वाक्याने गणोरे यांच्या मुलावरील संशय आणखी बळावला आहे.
या हत्येनंतर मुलगा सिद्धांत (21) बेपत्ता असून तो त्याचा मोबाइलही घरीच ठेऊन गेला आहे्त. सिद्धांत वांद्रे येथील नॅशनल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. सिद्धांत पूर्वी इंजिनीअरिंग करत होता. पण ते न जमल्याने त्याला सायन्समध्ये घालण्यात आले होते. एकुलता एक असलेल्या सिद्धांत अभ्यासात हुशार नसल्याने घरात सतत वाद होत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दीपाली गणोरे यांची गळ्यात चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. दीपाली यांच्या गळ्यावर 5 ते 6 आणि इतर ठिकाणी 3 ते 4 वार झाल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हत्येसाठी वापरलेला 13 इंची चाकू वाकोला पोलिसांनी जप्त केला आहे.