अवघ्या चार तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

 Ghatkopar
अवघ्या चार तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

घाटकोपर - तुझ्या वडिलांना पोलीसांनी पकडले आहे. तुझ्या आईलासुद्धा पोलीस ठाण्यात नेले असून तुलापण माझ्यासोबत यावे लागेल, असं खोटं बोलून आरोपी प्रभू खेडेकर (30) याने 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते. या आरोपीने 26 मार्चला सकाळी 9 वाजता मुलीचे घाटकोपर पूर्व येथील बेस्ट कॉलनी परिसरातून अपहरण केले होते. आरोपीने त्यानंतर मुलीच्या वडिलांना फोन करुन 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने या मुलीवर अनेक दिवसांपासून पाळत ठेवली होती.

मुलीचे अपहरण झाले हे कळताच वडिलांनी पंतनगर पोलिसांकडे धाव घेतली. या सर्व प्रकरणाची पंतनगर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन अवघ्या चार तासांमध्ये आरोपीला अटक केली. आरोपी प्रभू खेडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातून मूर्ती चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात 1, विक्रोळी पोलीस ठाण्यात चोरी आणि मारामारीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त सचिन पाटील, सहायक पोलीस आयुक्त भीमदेव राठोड आणि पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंतनगर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनद्वारे पाठलाग सुरू केला. त्यानुसार पोलिसांना आरोपीचा शोध घेत मुलीची सुटका केली.

Loading Comments