रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई


SHARE

रात्री 10 नंतर फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले असताना मानखुर्दमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री बारानंतर काही तरुण फटाके फोडत होते. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पात राहणारे शकील शेख यांनी पत्नी आणि लहान मुलांना त्रास होत असल्याने या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही दोन तरुणांनी मोठ्या आवाजाचे दहा फटाके फोडले.

शेख यांनी फटाके फोडतानाचे चित्रीकरण आपल्या मोबाइलमध्ये केले आणि याबाबतची तक्रार पोलिस नियंत्रण कक्षाकडे केली. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत दोन्ही तरुणांनी पळ काढला. त्यानंतर शकील शेख यांनी याबाबतची तक्रार ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात जाऊन दिली. त्यांनी मोबाइलमध्ये केलेले चित्रीकरण आणि इतर पुराव्यांच्या आधारे ट्रॉम्बे पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस

रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे मंगळवारी रात्रभर केल्या जात होत्या. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत फटाके वाजवणारे पळून गेलेले असतात किंवा फटाके फोडणे बंद झालेले असते. त्यामुळे कारवाई कोणावर करायची, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. विशेष म्हणजे याबाबत पुन्हा तक्रारदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नसल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे.


पुढाऱ्यांवर कारवाई होणार का?

मुंबईत ठिक-ठिकाणी सर्वसामान्यांवर नियमांचं उल्लघंन करत फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जात असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधीच न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत नियमांचे उल्लघंन करत आहे. तसंच हे आदेश मानणार नसल्याचंही ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत आहेत. सर्वसामान्यांवर ज्याप्रमाणे कारवाई केली जात आहे. त्याप्रमाणे या लोकप्रतिनिधींवर कारवाई पोलिस करणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या