SHARE

पायधुणी - हरवलेल्या लहान तसंच वृद्धांचा शोध हा पोलिसांना घ्यावाच लागतो, पण पायधुणी परिसरात हरवलेल्या एका वासराला देखील मुंबई पोलिसांनी शोधून काढलं आहे. फटाक्यांच्या आवाजाने हरवलेले गायीचे वासरू पायधुणी पोलिसांनी शोधुन मालकाला परत केले.

चंद्रशेखर पराडकर हे गायी पालनाचा पायधुणी परिसरात व्यवसाय करतात. दिवाळीची फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी सुरु होती. फटाक्यांच्या आवाजाला घाबरुन पराडकर यांच्या गायीच्या वासराने तेथून धुम ठोकली. त्यानंतर पराडकर यांनी वासराला शोधण्याचा प्रयत्न केला असताना ते काही मिळाले नाही. अखेर त्यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. तर पोलीस नियंत्रण कक्षाने तत्काळ पायधुणी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, एक गायीच वासरु मोहम्मद अली रोडवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हे वासरु ताब्यात घेतले. पराडकर यांना बोलावुन वासराची ओळख पटल्यानंतर हे वासरू त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या