अखेर प्रीतीला न्याय मिळणार !

 Churchgate
अखेर प्रीतीला न्याय मिळणार !

प्रीती राठी... दिल्लीतल्या सामान्य कुटुंबातील एक सामान्य मुलगी... पण तिची स्वप्न असामान्य होती. अत्यंत हुशार, मेहनती अशा प्रीतीची स्वत:च्या पायावर उभं राहण्याची धडपड होती. आयुष्यात आई- वडिलांसाठी काही तरी करून दाखवायची जिद्द, चुणूक तिच्यात होती. हेच स्वप्न उराशी बाळगून ती मुंबईत आली. पण तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. 2 मे 2013... हा दिवस प्रीती आणि तिच्या आई-वडिलांसाठी काळा दिवस ठरला. मुंबईतल्या नेव्ही हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यासाठी २ मे २०१३ ला प्रीती वांद्रे टर्मिनसवर उतरली. प्रीती उतरते नं उतरते तोच तिच्यावर एसिड हल्ला झाला. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली. तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला झाली होती. ‌तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली. पोलिसांनी सगळ्या बाजूनं तपास सुरू केला. जवळपास वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर अंकुर पनवारला अटक केली. पोलिसी खाक्यासमोर शरणागत होत नराधम अंकुरनं गुन्हा कबुल केला. पण जेव्हा सत्य कळलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रीती आणि अंकुर हे लहानपणापासूनचे मित्र. प्रीती हुशार, मेहनती पण अंकुर तिच्या अगदी विरूद्ध. त्यामुळे अंकुरच्या घरी प्रीतीचंच कौतुक व्हायचं. त्यामुळे अंकुरच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण होऊ लागला. आणि त्यातच अंकुरनं प्रीतीला घातलेली लग्नाची मागणी प्रीतीनं नाकारली. त्यामुळे अंकुरचा पुरुषी अहंकार आणखीनच दुखावला गेला आणि त्यानं प्रीतीला संपवण्याचा कट रचला. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवलं. न्यायालयानं कलम ३०२ आणि कलम ३२६ ब अंतर्गत अंकुरला दोषी ठरवलं. प्रीतीचं हुशार, मेहनती, जिद्दी होणं चुकिचं होतं का? पालकांनी आपल्या मुलांमध्ये भेदभाव करणं, दुस-यांच्या मुलांशी तुलना करणं हे किती धोकादायक असू शकतं याचच हे उदाहरण म्हणावं लागेल. 

Loading Comments