Exclusive : सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीएचा' धाक - पोलिस आयुक्तांचे आदेश

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू

Exclusive : सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीएचा' धाक - पोलिस आयुक्तांचे आदेश
SHARES

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांना सराईत आरोपीॆची यादी बनवून त्या आरोपींवर 'एमपीडीए' (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी अ‍ॅक्ट) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश  बुधवारी पोलिस आयुक्त परमबीर सिॆह यांनी गुन्हे परिषदेत सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिलेत. त्याच बरोबर सर्व सामान्यांचे पोलिसांसोबत मैञीपूर्ण संबध रहावेत. यासाठी नागरिकांसाठी स्वागत कक्ष ही माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची संकल्पना सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यानंतर पुढील काही दिवस आयुक्त स्वत: पोलिस ठाण्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती सूञांनी दिली.

शहरात वारंवार नागरिकांना मारहाण करणे, खून, खंडणी, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, जाळपोळ, तोडफोड, हातभट्टी दारू विकणे, तसेच अवैध धंदे बळाच्या जोरावर चालविण्यासारखे गंभीर गुन्हे गुंड व गुन्हेगारांकडून केले जातात; त्यामुळे त्यांची नागरिकांमध्ये दहशत असते. अशा वेळी नागरिकही त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न पोलिस आणि प्रशाससनापुढे निर्माण होतो. त्यामुळे अशा गुंड व गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांना वचक बसविण्यासाठी आयुक्तांनी परिसरातील 20 सराईत आरोपींची यादी तयार करून त्याच्यावर एमपीडीए अँक्ट नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर आयुक्तांनी मुंबईतील सर्व 94 पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना  महिला विरोधातील गुन्हे कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.


 आयुक्त परिमंडळानुसार मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना भेटी देऊन पोलिस आणि तेखील उद्भवणाऱ्या समस्यां समजून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मुंबईतील  प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष सुरू करण्यात येणार असून महिला कर्मचारी तेथे तैनात करण्यात येणार आहे. ही महिला पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला  योग्यता कक्षात जाण्यासाठी मदत करणार आहे.  येणारा प्रत्येक नागरिकाशी  सौजन्याने वागण्याचे आदेशही  स्वागत कक्षा वरील महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.याशिवाय मुंबईतील गुन्हेगारीचा कणा मोडणाऱ्या गुन्हे शाखेलाही त्यांच्या कारवाया वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई वरही भर देण्यास सांगितले आहे असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.


काय आहे एमपीडीए कायदा?

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.  परंतु कारवाईनंतर त्याला पोलिस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा