परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.

परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू
SHARES

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. 

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आला आहे. 

या प्रकरणी राज्य सरकार आणि परमबीर यांची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी राज्य सरकारने कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगत परमबीर यांच्या चौकशीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना आता परदेशात जाता येणार नाही. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे. परमबीर सिंग यांना न्यायालयाने 28 जुलै पर्यंत दिलासा दिला होता. या दिलाशाची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात "लूक आऊट" नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची किंवा त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा