अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. पण...

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
SHARES

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे.

कोर्टानं म्हटलं की, तुरुंगाबाहेर आल्यानंतर रियाला आपला पासपोर्ट जमा करावा लागेल. ती परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही. मुंबईबाहेर जाण्यापूर्वी तपास अधिका-यांना त्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. तसंच, १० दिवसांत पोलिस ठाण्यात हजेरी लावणं अनिवार्य असेल. यापूर्वी सत्र न्यायालयानं मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची म्हणजे २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ८ सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. एका महिन्यापासून तुरूंगात असलेल्या रियाची सत्र न्यायालयानं दोनदा जामीन याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असं तपास यंत्रणेनं कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तर रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत २०१९ पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचं सांगितलं आहे.



हेही वाचा

वांद्रेतून ४२ किलोचा गांजा जप्त, हैद्राबादमधील १९ वर्षीय तरुणाला अटक

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची जाणून बुजून बदनामी, ८० हजार बनावट अकाऊंट उघडकीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा