आरपीएफ पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न


आरपीएफ पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

आरपीएफ पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडली. आर. आर. मिश्रा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मिश्रा यांच्यावर सायनच्या लोकमान्य टिळक शासकीय रुग्णासलयात उपचार सुरू असून कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.


का केला आत्महत्येचा प्रयत्न?

आर. आर. मिश्रा हे माटुंग्याच्या रेल्वे वर्कशॉप येथे कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी रेल्वे वर्कशॉपमध्ये लोखंड चोरीची घटना घडली होती. एक ट्रकभर तांबे आणि पितळेचे साहित्य रेल्वे यार्डातून विकण्यात आलं होतं. माटुंगा पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार नोंदवण्यात आली होती. यामध्ये ११ आरपीएफ अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती. त्यामध्ये मिश्रा यांचं देखील नाव असून या सर्वांना निलंबित करण्यात आलं होतं. सध्या या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ आरपीएफ अधिकारी सुरेश अत्री करत होते.

मागील काही दिवसांपासून मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांना चौकशीला बोलवलं जात होतं. दरम्यान सोमवारी सकाळी मिश्रा यांना चौकशीसाठी कुर्ला आरपीएफ कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी कुर्ला स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येणाऱ्या टिटवाळा लोकलसमोर उडी टाकत मिश्रा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने मिश्रा या अपघातात वाचले. मात्र यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मिश्रा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिश्रा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलीस वस्तुस्थिती पडताळत आहेत.


मिश्रा यांच्या आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिश्रा हे बेशुद्ध असून त्यांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मिश्रा हे शुद्धीवर आल्यानंतरच त्यांनी ही टोकाची भूमिका का घेतली हे समजू शकेल. तूर्तास तपास सुरू आहे.

- समाधान पवार, पोलीस उपायुक्त, सेट्रंल रेल्वे


होणार होती चौकशी 

आरपीएफ पोलिसांच्या देखरेखीखाली येणाऱ्या माटुंगा यार्डात २९ डिसेंबर रोजी एक खासगी ट्रक यार्डातील लोखंड भरून निघून गेला. त्या यार्डाच्या सुरक्षेची जबाबदारी आत्महत्येचा प्रयत्न करणारे पोलिस उपनिरीक्षक आर. आर. मिश्रा यांच्यावर होती. हा चोरीचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर माटुंगा यार्ड आरपीएफ चौकीत गुन्ह्यांची नोंद करत आरपीएफ पोलिसांनी मुसावालीया शेख, ट्रक मालक अब्दुल हाकीम, शहिद मन्सुरी उर्फ गुड्डू यांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीत आरपीएफ अधिकाऱ्यांची नावं पुढं आल्यानंतर यार्डाची जबाबदारी असलेल्या ५ अधिकाऱ्यांचं त्यावेळी तातडीने निंलबन केलं होतं. 

या गुन्ह्यात आरोपी आरीएफचा अधिकारी अर्जुन कुमार बिंद याला अटक केली. बिंद यांच्या चौकशीत आर.आर. मिश्रामचं नाव पुढं आलं. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कुर्ला आरपीएफचे वरिष्ठ सुरेश अत्री यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी अत्री यांनी मिश्राम यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीसाठी आलेल्या मिश्राम यांनी अचानक गर्दीतून फलाटावर आलेल्या रेल्वेसमोर उडी टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात अन्य काही अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं आरपीएफचे आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा