Sakinaka Rape-Murder Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचा दावा करून राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली होती.

Sakinaka Rape-Murder Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा
SHARES

मुंबईतल्या अंधेरी (Andheri) येथील साकीनाका (Sakinaka Rape-Murder Case) बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहन चौहान असं अरोपीचं नाव आहे. दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचा दावा करून राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली होती.

या प्रकरणात आरोपीनं बलात्कारानंतर पीडितेवर केलेल्या निर्घृण हल्ल्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयानं (Dindoshi Sessions Court) आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं आहे.

पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं.

346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं.

आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा