अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे सायन्सचा टॉपर बनला बाईकचोर!

Andheri
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे सायन्सचा टॉपर बनला बाईकचोर!
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे सायन्सचा टॉपर बनला बाईकचोर!
See all
मुंबई  -  

बारावीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवून विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय अथवा इतर आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र अंधेरीतल्या एका विद्यार्थ्याला करिअर घडवण्याच्या ऐन मोक्यावर अंमली पदार्थांची नशा करण्याची सवय जडली. त्यातून त्याने बाईकचोरीला सुरूवात केली. अशा रितीने या तरूणाचे करिअर असे भरकटले की हा तरूण जाऊन पडला, तो थेट तुरूंगात. जयकिशन सिंग असे या तरूणाचे नाव असून तो अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी येथे राहणारा आहे. जयकिशनचे वडील एक नामांकित डॉक्टर आहेत.

गेल्या वर्षी सायन्समधून बारावीच्या परीक्षेला बसलेल्या जयकिशनला थोडेथोडके नव्हे, तर 98.50 टक्के गुण मिळाले होते. या टक्केवारीकडे पाहून कुणीही म्हणेल की, जयकिशनने आपल्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर होण्यासाठी चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळवला असेल. पण तसे झाले नाही. कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्याला अंमली पदार्थांची नशा करण्याची सवय जडली होती. मात्र घरातून पैसे मिळण्याचे बंद झाल्याने त्याने थेट बाईकचोरीचा मार्ग अवलंबला.

मुळातच हुशार असलेला जयकिशन ठिकठिकाणच्या बाईक चोरून त्या 'ओएलएक्स' या ऑनलाइन साईटवर विकायचा. अंधेरी परिसरातून एकाच पद्धतीने बाईक चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांच्या जाळ्यात जयकिशन अलगद अडकला. सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.