अँटॉप हिलमध्ये दोघांच्या भांडणात वृद्धाचा मृत्यू

 Antop Hill
अँटॉप हिलमध्ये दोघांच्या भांडणात वृद्धाचा मृत्यू
Antop Hill, Mumbai  -  

दोन तरुणांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या वयोवृद्ध इसमावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिलच्या माला गार्डन परिसरात घडली आहे. या हल्ल्यात अँटॉप हिल परिसरात राहणारा प्रभाकर चिपळूणकर (60) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी आरोपी विनायक पवार (23) याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर चिपळूणकर माला गार्डनमध्ये विश्रांतीसाठी बसले होते. तेव्हा त्यांच्यासमोर वैयक्तिक कारणावरून दोन तरुणांचे भांडण सुरू झाले. बाचाबाचीवरून सुरू झालेले भांडण पार हाणामारीपर्यंत गेल्याने चिपळूणकरांना रहावले नाही आणि ते भांडण सोडवण्यासाठी सरसावले. त्यांनी दोन्ही तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. 

वृद्धाने मध्यस्थी केल्याचे पाहून विनायक पवार संतापला. त्याने संपूर्ण राग वयोवृद्धावर काढला. तात्काळ गार्डन लगतच्या ज्युसच्या हातगाडीवरील काचेचा ग्लास फोडला आणि वृद्ध चिपळूणकर यांच्या गळ्यावर वार करून पोटात घुसवला. पोटावर वार होताच चिपळूणकर जमिनीवर कोसळले. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ चिपळूणकरांना शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात चिपळूणकर यांचा मृत्यू झाला.

गुन्हा गंभीर असल्याने हे प्रकरण पोलीस उपनिरीक्षक दीपक साळुंखे आणि पथकाकडे वर्ग करण्यात आले. आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत गुंड असल्याने पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर छापे मारले. चुनाभट्टी येथे रात्रीच्या अंधारात सापळा लावून आरोपीला मध्यरात्री अटक करण्यात आली.

Loading Comments