आईने आपल्याच मुलीला देह व्यापारात ढकललं

 Mira Bhayandar
आईने आपल्याच मुलीला देह व्यापारात ढकललं

मिरा रोडच्या काशिमीरात पोलिसांच्या समाजसेवा शाखेने एका फ्लॅटमध्ये छापेमारी करुन 3 महिला आणि एका पुरुष दलालाला अटक करत 3 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमधील एक महिला ही सुटका करण्यात आलेल्या मुलींमधील एकीची आई आहे. ही महिला आपल्याच मुलीला देहव्यापारात गुंतवत होती. एका सामाजिक संस्थेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली.

पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हे प्रकरण पुढील तपासासाठी काशिमिरा पोलिसांच्या हवाली केले आहे. समाजसेवा शाखेचे पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार काशिमीरातील कॅरोलीन सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी एक नकली ग्राहक पाठवल्यानंतर तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस निरीक्षक बांगर यांनी कारवाई करत त्या फ्लॅटवर छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुष दलालला अटक केली. तसेच त्यांच्या तावडीत असलेल्या एका 15 वर्षाच्या मुलीसह आणखी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली.

Loading Comments