देहविक्री करणाऱ्या महिलेची फक्त 600 रुपयांसाठी हत्या


देहविक्री करणाऱ्या महिलेची फक्त 600 रुपयांसाठी हत्या
SHARES

विरार (प.) येथील अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फक्त 600 रुपयांसाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करत  तपास सुरू केला आहे. 18 एप्रिल रोजी महिलेची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला होता. घटनास्थळी कोणतीही संशयित वस्तू पोलिसांना आढळली नाही. फक्त सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचणे सोपे झाले.

मिळालेल्या माहितीनुसार विरार (प.) येथील डीमार्टसमोरील पेनिनसुला पार्कजवळ एका निर्जनस्थळी 18 एप्रिल 2017 रोजी तिथल्या स्थानिकांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र तिची ओळख पटली नव्हती. तिथल्या स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसमोर तिची हत्या कोणी आणि का केली, असा प्रश्न उभा राहिला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना अर्नाळा पोलिसांनी विरार (पू.) येथील कुंभारवाडा परिसरात रहाणाऱ्या अब्दुल उर्फ सिकंद शेख (43) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही देहविक्रीचा व्यवसाय करत होती. घटनेच्या रात्री अब्दुल आणि मृत महिला यांच्या 600 रुपयांचा सौदा झाला होता. त्यानंतर तो महिलेला रिक्षातून पेनिनसुला पार्क येथील एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्यावेळी मध्यरात्रीचे 2 वाजले असताना या दोघांमध्ये पैशावरून वाद सुरू झाला. महिलेला निश्चित रक्कम न दिल्याने महिलेने अब्दुलला जाब विचारला तेव्हा अब्दुलने रागाच्या भरात ओढणीच्या सहाय्याने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. दुसऱ्या दिवशी तिथल्या काही स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सांगितले की, घटनास्थळी कोणतीच संशयित वस्तू सापडली नव्हती. तिथे लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीपर्यंत पोहचता आले. आरोपी आणि महिला एका रिक्षातून उतरल्याचे त्या सीसीटीव्हीच्या दृष्यातून दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला शोधून काढले. रिक्षाचालकाच्या म्हणण्यानुसार आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आले आणि आरोपीचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. चौकशीत आरोपी अब्दुल उर्फ सिकंद शेख याने हत्येची कबुली दिली, अशी माहिती कोल्हे यांनी दिली. आरोपी हा गवंडी आहे. मृत महिला बंगालची रहाणारी असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा