माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण: ‘त्या’ ६ शिवसैनिकांना पुन्हा अटक

कांदिवलीतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या ६ शिवसैनिकांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण: ‘त्या’ ६ शिवसैनिकांना पुन्हा अटक
SHARES

कांदिवलीतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या ६ शिवसैनिकांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. भादंवि कलम ४५२ (बेकायदा घरात घुसणे) आदी कलमाअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (shiv sainik again arrested by police for allegedly beaten up retired navy officer in samata nagar kandivali)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यानं शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. त्यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी एकूण ६ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची शनिवारी जामिनावर सुटका झाली. परंतु रात्री उशिरा या सगळ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना न्यायालयापुढं हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा - तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, माजी नौदल अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर संताप

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (६२) हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच मदन शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकलं. हे व्यंगचित्र पाहून भावना दुखावल्याने स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम आणि संजय मांजरे आणि इतर शिवसैनिकांनी शर्मा यांना घराबाहेर बोलवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

मदन शर्मा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी हल्ल्यासाठी जबाबदार आरोपींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं.  त्यानुसार पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. परंतु आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. 

या मारहाण प्रकरणावरून भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर कडाडून टीका करण्यास सुरूवात केली. उद्धवजी गुंडाराज आवरा, एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला निव्वळ एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं.

हेही वाचा - निवृत नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, ‘उद्धवजी गुंडाराज थांबवा’ - फडणवीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा