रश्मी शुक्लांनी फोन टॅप कसे केले? अहवालात गंभीर ताशेरे

शुक्ला यांनीच हा अहवाल फोडल्याचं उघड झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

रश्मी शुक्लांनी फोन टॅप कसे केले? अहवालात गंभीर ताशेरे
SHARES

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. गुप्त अहवाल उघड झाल्याचं हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे शुक्ला यांनीच हा अहवाल फोडल्याचं उघड झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. 

रश्मी शुक्ला यांचा गुप्त अहवाल विरोधकांच्या हाती पडल्याने प्रशासकीय बदल्यांसाठी मोठं रॅकेट चालवलं जात असल्याचा गंभीर आरोप विरोधक भाजपकडून सरकारवर करण्यात येत आहे. या अहवालात फोन टॅपिंगच्या माध्यमातून अनेक पुरावे हाती लागल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र सरकारची परवानगी न घेताच फोन टॅप कसे करण्यात आले, यावरून प्रश्न उपस्थित झाल्यावर या सर्व प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेनंतर फोन टॅपिंगप्रकरणी ताबडतोब अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आले होते. त्यानुसार हा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना गुरूवारी सादर केला आहे. 

या अहवाला राष्ट्राची सुरक्षा, देशविघातक कृत्ये आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविणे यावर प्रभावीपणे नजर ठेवणे तसंच षडयंत्र मोडून काढणे या कामासाठी तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना इंडियन टेलिग्राफ अॅक्टच्या तरतुदीनुसार फोन टॅपिंगची परवानगी देण्यात आली होती. 

हेही वाचा- तर तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

परंतु त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून राजकीय मतभेद, व्यावसायिक तंटे, कौटुंबिक कलह अशा स्वरूपाच्या कामासाठी फोन टॅपिंगचा वापर केला. त्यांनी काही जणांचे फोन टॅप केले व त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा उल्लेख होता. मूळ उद्देशापेक्षा वेगळ्याच प्रयोजनासाठी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचा वापर केल्याचं सकृतदर्शनी निदर्शनास आलं आहे. 

शुक्ला यांनी सरकारला सादर केलेला अहवाल पेन ड्राइव्हमध्ये नव्हता. आता मात्र त्याची प्रत त्यांच्याकडून उघड झाल्याचा संशय येतो. हा गुप्त अहवाल त्यांनी उघड केल्याचं निष्पन्न झाल्यास शुक्ला कठोर कारवाईस पात्र ठरतात, असं सीताराम कुंटे यांनी अहवालात म्हटलं आहे. 

कोरोनाच्या संकटात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. काही अपवाद वगळता २०२० मध्ये पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसारच भारतीय पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. २७ जून ते १ सप्टेंबर या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली नव्हती. ऑगस्टमध्ये शुक्ला यांनी अहवाल दिला त्या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती याकडे कुंटे यांनी अहवालात लक्ष वेधलं आहे.

त्यावरुन आता रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

(sitaram kunte submit report against former ips officer rashmi shukla in phone tapping case)

हेही वाचा- ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्यावर.., नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा