घोड्यावरून पडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू


घोड्यावरून पडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू
SHARES

दक्षिण मुंबईच्या कुपरेज गार्डनमध्ये रविवारी एक सहा वर्षांची मुलगी घोड्यावरून खाली पडून मृत पावली. या सहा वर्षांच्या मुलीचे नाव जान्हवी शर्मा असल्याचे बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ती छोटा शिशू वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. कुलाबा पोलिसांनी त्या घोडा चालकाला अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी 4.15 वाजेच्या दरम्यान ती मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत गार्डनमध्ये गेली होती. त्याचवेळी ती घोड्यावर बसली असताना त्या घोड्याचा पाय लचकल्याने ती खाली पडून जखमी झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिथल्या डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.  

पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घोडा चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्हदरम्यान घोडेस्वारीवर निर्बंध लावण्यात आले असतानाही कूपरेज गार्डनच्या जवळ ही घोडेस्वारी सुरूच आहे'.

पीडित मुलीचे वडील महेंद्र शर्मा हे एका खासगी कंपनीचे सीईओ आहेत. दक्षिण मुंबई हा परिसर घोडेस्वारीसाठी लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे रविवारी लहान मुले आपल्या कुटुंबियांसोबत घोडेस्वारीचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात.

दरम्यान या प्रकरणी आरोपीविरोधात 304 आणि 279 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी आरोपींना कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा