दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलाने दगडाने ठेचून केली हत्या


दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलाने दगडाने ठेचून केली हत्या
SHARES

दारूड्या बापाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलाने आणि मेव्हण्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री वरळी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गेश बोबडे (१८) आणि राकेश खोपकर (३१) यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलस कोठडी सुनावली आहे.


दारू पिऊन रोजचा त्रास

वरळीच्या जिजामाता नगर परिसरात अनिल रोहिदास बोबाडे त्यांचा मुलगा दुर्गेश, पत्नी, मेव्हणा राकेश आणि सासूसोबत रहात होते. अनिल यांना दारूचे व्यसन होतं. सुरक्षा रक्षकाची नोकरी करणारे अनिल कायम नशेत असायचे. दारू पिऊन घरातल्यांना शिवीगाळ करणं, बायकोला, मुलाला मारहाण करत असत. अनिलच्या रोजच्या त्रासाला घरातले सर्वच कंटाळले होते. अनिल यांचं दारूचं व्यसन सुटण्यासाठी कुटुंबियांनी अनेक उपाय करून पाहिले. परंतु अनिल यांचं व्यसन सुटू शकलं नाही.


कशी घडली घटना?

सोमवारी रात्री अनिल यांनी दारूच्या नशेत त्यांची सासू आणि पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी आईला आणि आजीला मारल्याचा राग अनावर झाल्याने दुर्गेशने अनिल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनिल यांचा मेव्हणा राकेश त्या ठिकाणी आला. त्याला देखील अनिलचं हे वागणे सहन न झाल्याने त्यानेही अनिलला मारहाण केली. अशातच दुर्गेशने रागाच्या भरात रस्त्यावरील दगड उचलून अनिल यांच्या डोक्यात टाकला.


दोघांनाही अटक

ही घटना घडल्यावर गोळा झालेल्या स्थानिकांनी दोघांना अडवत जखमी अनिलला रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान अनिल यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनिल यांच्या हत्येप्रकरणी मुलगा दुर्गेश आणि मेव्हणा राकेशला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन देसूरकर यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा