पोलिसांना मिळणार पुरावे गोळा करण्याचं ट्रेनिंग

 Kalina
पोलिसांना मिळणार पुरावे गोळा करण्याचं ट्रेनिंग

गुन्हा कोणताही असो, तो करणाऱ्या गुन्हेगाराला योग्य शिक्षा व्हावी असाच न्यायसंस्थेचा आणि पोलिस यंत्रणेचा प्रयत्न असतो. मात्र अनेकदा गुन्हा घडलाय हे माहीत असतं, संबंधित गुन्हेगारही अनेक घटनांमध्ये सर्वांच्या नजरेसमोर असतो, मात्र फक्त पुरेसे पुरावे नसल्यामुळे गुन्हेगाराची निर्दोष मुक्तता होते, किंबहुना न्यायसंस्थेला किंवा पोलिसांना गुन्हेगाराला निर्दोष मुक्त करावं लागतं.

प्रत्येक वेळी गुन्हा घडल्यानंतर फॉरेन्सिक लॅब्सच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी वेळेत पोहोचणं शक्य होत नाही. तोपर्यंत अनेकदा पुराव्यांचं मोठं नुकसान झालेलं असतं, किंवा पुरावेच नष्ट झालेले असतात. त्यामुळे गुन्हेगारांविरोधात पुरावे सापडत नाहीत. मात्र यावरच तोडगा काढण्यासाठी कलीना येथे असलेल्या एफएसएल अर्थात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने पोलिस कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षित करण्याचा मार्ग निवडला आहे.'कन्व्हिक्शन रेट' वाढवण्यासाठी कालिना एफएसएलचा उपक्रम

लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात घटनास्थळावरील पुराव्यांचे प्रमाण हे तब्बल 60 ते 70 टक्क्यांच्या घरात आहे. इतर गुन्ह्यांमध्ये देखील हे प्रमाण जास्तच आहे. म्हणूनच मुंबईच्या कालिना येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने (एफएसएल) पोलिस कर्मचाऱ्यांना फॉरेन्सिक सायन्सचे पद्धतशीर ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आहे. 28 जूनला एफएसएलने मुंबईसह राज्यभरातील पोलिसांच्या पहिल्या चमूला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आहे.

जून महिन्यात 'मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट' या उपक्रमांतर्गत 45 अद्ययावत व्हॅन या महाराष्ट्राभरात देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने या लॅब्स धुळखात पडल्या होत्या. यावर आता 'एफएसएल'च्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढला आहे.


20 दिवसांच्या या शिबिरात 25 पोलिस अधिकाऱ्यांना डीएनए, टॅक्सिकॉलॉजी, फिंगरप्रिंट, नार्कोटिक्स, फिजिक्स, सायबर क्राईम, व्हॉइस आणि मोबाईल अॅनालिसिस या सगळ्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे कन्व्हिक्शन रेट वाढण्यास मदत होईल.

- डॉ. कृष्णा कुलकर्णी, संचालक, एफएसएल

या प्रशिक्षणानंतर सगळ्या अधिकाऱ्यांची परीक्षा देखील घेतली जाणार आहे. पोलिसांनंतर हे प्रशिक्षण न्यायाधीश, सरकारी वकील आणि डॉक्टरांना देखील देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

Loading Comments