घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली आहे. दादर इथल्या त्यांचं ‘राजगृह’ या निवासस्थानावर ही दगडफेक झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही देखील पोलिसांच्या हाती लागलं आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दादर हिंदू कॉलनी इथं बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती इमारतीच्या आवारात शिरल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इमारतीच्या आवारात शिरल्यावर घराबाहेरील कुंड्यांची आणि घरांच्या काचांची तोडफोड केली आहे. फक्त एवढंच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीनं घटनास्थळावर दाखल झालं. आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपुर्द केलं आहे. संबधित माथेफिरू हल्लेखोरांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी पुस्तकांचे मोठे संग्रहालय आहे. राज्यातून आणि देशभरातून मुंबईत येणारे बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी राजगृहला भेट देत असतात. या घटनेनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं याविरोधात एक पत्रक काढलं आहे. पत्रकातून त्यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. ज्या माथेफिरूंनी हल्ला केला त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवं, अशी मागणी वंचितने केली आहे. पण यासोबतच त्यांनी कार्यकत्यांना आणि आंबेडर अनुयायांना शांततेचं आवाहन केलं आहे.
अनिल देशमुख यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करत कडक कारवाई करणार असं म्हटलं आहे.
दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 7, 2020
हेही वाचा