चोर समजून अनोळखी इसमाची हत्या, तिघांना अटक


चोर समजून अनोळखी इसमाची हत्या, तिघांना अटक
SHARES

बुधवारी बोरिवली येथे चोर समजून एका अनोळखी इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एम. एच. बी. पोलिसांनी ओंकार सावंत (२२), प्रतीक कांबळे (२३) आणि सत्यमूर्ती नयनार (५३) नावाच्या तिघा आरोपींना अटक केली आहे.


अनोळखी होता म्हणून समजले चोर

मंगळवारी रात्री बोरिवली पश्चिमेच्या धर्मा नगर येथील विचारे कम्पाउंडमध्ये एक अनोळखी इसम शिरला. हा इसम चोर असल्याच्या संशयावरून तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. झाडाला बांधून या इसमाला लाठ्या-काठयांनी अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सोडून देऊन तिघे कर्मचारी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत त्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याचं बघताच तिघे घाबरले आणि त्यांनी या इसमाचा मृतदेह टेम्पोत टाकून निर्मनुष्य ठिकाणी फेकून दिला.

बुधवारी दुपारच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याची खबर मिळताच एम. एच. बी. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. डॉक्टरांनी या इसमाचा मृत्यू हा मारहाणीने झाल्याचं सांगताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तात्काळ तपासाला सुरुवात केली.


मृताची ओळख पटली नाही

तपास करत असताना विचारे कम्पाउंडमध्ये काम करणाऱ्या तिघांनी मिळून चोर समजून या इसमाला मारल्याचं पोलिसांना समजलं. या तिघांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती एमएचबी पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी तिघांना कोर्टात हजार करण्यात आलं असता 27 तारखेपर्यंत तिघांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप ज्या इसमाची हत्या करण्यात आली त्याची ओळख पटलेली नाही.

काही दिवसांपूर्वी मालवणीत एका इसमाला चोर समजून मारण्यात आलं होतं. असाच प्रकार कल्याण परिसरात देखील समोर आला होता, जिथे जमावाच्या मारहाणीत तरुणाची हत्या करण्यात आली होती.हेही वाचा

भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांच्या समोरच दोघांवर चाकूहल्ला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा