‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

पोलीस यंत्रणेने विविध माध्यमातून धारावीतील नागरिकांना जागृत केले, असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा वाटा या यशात आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

‘धारावी पॅटर्न’ मध्ये  पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख
SHARES

आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या धारावी परिसरात कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात धारावीकरांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा "धारावी पॅटर्न" समोर आला आहे. धारावीत कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार, राज्य प्रशासन,महानगरपालिका, धारावीच्या आमदार व मंत्रीमंडळातील माझ्या सहकारी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणून हे यश दृष्टिक्षेपात आले. या मोहीमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील मौलिक  कामगिरी केली,त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः- Sharad Pawar interview: पुढच्या निवडणुका निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

   कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची  संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने देखील दखल घेतली आहे, ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरुवातीपासून पोलीस यंत्रणेने विविध माध्यमातून धारावीतील नागरिकांना जागृत केले, असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा वाटा या यशात आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

   पोलिसांचे विविध प्रयत्न

धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती, त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग पाळणे हे अत्यंत कठीण.  त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली. पोलिसांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकद्वारे  माहिती देणे. तसेच अत्याधुनिक अशा ड्रोन चा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकद्वारे लोकांना माहिती देऊन जागृत करणे. या अत्याधुनिक ड्रोन मुळे  जवळपास चार किलोमीटरचा परिसर  कव्हर होत होता.तसेच काही प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर  कठोर कारवाई करून, त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे. अशा प्रकारची कामे पोलिसांनी केली. तसेच कोरोना बद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून तिचे प्रसारण व्हाँट्सअप ग्रुप द्वारे, सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशीद यातील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांपर्यंत ती क्लिप, त्यातील माहिती पोहोचविली. अरुंद गल्ल्यातून पायी गस्त घालून लोकांची जनजागृती केली.

    कोरोना  जनजागृती नंतर लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे हेदेखील मोठे आव्हान शासन प्रशासनासमोर होते. त्या कामी देखील पोलिस विभागाने मोठी मदत केली. सर्व  दुकानदारांना बोलावून सोशल डिस्टेंसिंग चे महत्व पटवून दिले व त्यानुसारच लोकांना त्यांनी किराणा, भाजीपाला द्यावा अशा स्पष्ट सूचना दिल्या, भाजीपाला मटन, चिकन यांची दुकाने  मोकळ्या जागी हलवली. याचाही फायदा निश्चितच झाला.  धारावीतील पंचवीस-तीस खानावळवाल्यांना बोलावून लोकांना घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे या परिसरात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दररोज २५ ते ३० हजार लोकांना दोन वेळेस मोफत जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात बिहारी लोक व्यवसायानिमित्त राहतात त्यांनाही त्यांच्या बिहारी जनता असोसिएशन मार्फत बोलावून सूचना व मदत केली. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी धारावीच्या विविध भागातील प्रत्यकी २-२ स्वयंसेवकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना कोरोना बद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्फत त्याच्या भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात, लोकांची जनजागृती करण्यात यश मिळाले.

हेही वाचाः- मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस

मास्क व सॅनिटायझर चे मोफत वाटप

धारावी परिसरातील गोरगरीब लोकांसाठी या काळात आवश्यक असलेले मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.सामाजिक संस्थांच्या मदतीतून २ लाख मास्क व १ लाख सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच ५ लाख रेडी मिक्स फुड पाकीटचे ही वाटप गोरगरिबांना करण्यात आले.

    परप्रांतीय कामगार

धारावी भागात राजस्थान, झारखंड, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यातील बरेच परप्रांतीय कामगार कामानिमित्त आहेत. या काळात त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोठी जबाबदारी पोलिस विभागावर होती. या भागातील ६१,४१५ कामगार श्रमिक रेल्वेने व १२,४९५ कामगार एस.टी. बस ने त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. त्यामुळे ही जनता देखील काही प्रमाणात कमी झाली.

रुट मार्च व कोंम्बींग आॅपरेशन

लाॅकडाऊनचे कालावधीमध्ये तीन एस.आर.पी.एफ प्लाटुन, एक सी.आर.पी.एफ कंपनी व सशस्त्र पोलीस दलातील १०० पोलीस अंमलदार व धारावी पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांचेसह एकुण ३८ वेळा रुट मार्च व २८ वेळा कोंम्बींग आॅपरेशनचे आयोजन करण्यात आले. या सर्व कालावधीत धारावीत ४० पोलीस कर्मचारी व १० एस. आर. पी. एफ. जवान यांना कोरोना ची लागण झाली. त्यावर मात करून हे कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यासाठी रूजू झाले. ही अभिमानाची बाब आहे. मुंबई पोलीस आयुक्त,  सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अशा सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  सर्व घटकांच्या या सामूहिक प्रयत्नास धारावीतील सर्व जनतेने मौलिक अशीच साथ दिली, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. संपूर्ण जगाचे लक्ष धारावी कडे लागले होते.  धारावीने कोरोना वर मात करू शकतो हे सिद्ध करून नवा संदेश जगाला दिला. असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा