चोरांनी 'स्पायडरमॅन' स्टाइलनं ज्वेलर्सचं दुकान लुटलं


चोरांनी 'स्पायडरमॅन' स्टाइलनं ज्वेलर्सचं दुकान लुटलं
SHARES

काळाचौकी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पायल ज्वेलर्सवर 'स्पायडरमॅॅन' स्टाइलनं दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी ज्वेलर्सचं छत फोडून दोरीच्या साहाय्यानं दुकानामधील तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल गायब केला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे न सोडल्यानं पोलिसांची पंचायत झाली आहे.


लाखोंचे दागिने चोरीला

काळाचौकीतल्या श्रीकांत हडकर मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्यापासून शंभर पावलांवर पायल ज्वेलर्सचं दुकान आहे. 21 जून रोजी नेहमीप्रमाणे सर्व महत्वाचे दागिने तिजोरीत ठेवून तर काही दागिने दुकानाच्या कपाटात ठेवून त्याची चावी दुकानाच्या ड्राॅवरमध्ये ठेवून मालक घरी गेले. 22 जून रोजी सकाळी त्यांनी दुकान उघडल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. दुकानाच्या छताला भगदाड पाडून त्यातून एक दोरी लोंबकळत होती. दुकानातून लाखोंचे दागिने चोरांनी चोरले होते. दुकान मालकाने तातडीने काळाचौकी पोलिसांना पाचरण केले.


सीसीटीव्हीसह हार्डडिस्कही चोरली

पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता, चोरांनी छताला भगदाड पाडले होते. दोरीच्या मदतीने आरोपींनी दुकानात प्रवेश करून सोन्याचे दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काऊन्टरवरील ड्राॅवरमध्ये चोरांना लाॅकरची आयती चावी मिळाली. मग काय चोरांनी ड्राॅवरमधील तब्बल 5 लाखांचे दागिने झोळीत टाकले. त्यानंतर चोरांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरीला पासवर्ड असल्यामुळे चोरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यावेळी एका चोराचं लक्ष दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडलं. सीसीटीव्हीच्या मदतीनं आपण पकडले जाऊ, हे लक्षात येताच चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह त्याची हार्डडिक्सही चोरून नेली.


तिजोरीही चोरण्याचा प्रयत्न

या चोरांनी तिजोरीही घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. मात्र तिजोरीमुळे पकडलो जाण्याची शक्यता असल्यानं बहुदा त्यांनी तिजोरी चोरी न करण्याचं ठरवलं असेल. कारण तिजोरी दोरीनं बांधलेली होती. व तिजोरी नेहमीच्या जागेवर नव्हती. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.


हेही वाचा -

मोबाइलच्या जागी साबणाची वडी

'तिने' ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं, ९ जणांना उडवलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा