चोरीचा बनाव रचून रोकड लंपास करणारे गजाआड

 Goregaon
चोरीचा बनाव रचून रोकड लंपास करणारे गजाआड
चोरीचा बनाव रचून रोकड लंपास करणारे गजाआड
See all

बारा लाख रुपयांची रोकड चोरल्याचा बनाव करून आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या तिघांना आरे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. प्रसाद पाटील, मुयर विचले, अनिल कोंडसकर अशी या तिघा आरोपींची नावे आहेत. यातील चौथा आरोपी फरार आहे. मयूर आणि अनिल हे दोघे लॉजिकॅश सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामाला असून, या कंपनीचे कार्यालय गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आहे. हे दोघे एलआयसी, रिलायन्स डिटीडीसी, रॉयल सुंदरम्, हॅथवे केबल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, फ्लिपकार्ट या कंपनीत मरोळ, साकीनाक, अंधेरी येथे पैसे गोळा करण्यासाठी गेले होते. दोघे मोटारसायकलवरून 12 लाख रुपयांची रोकड घेऊन कार्यालयाच्या दिशेने जात होते. 

त्या दरम्यान आरे युनिट 16 जवळ 2 अज्ञात चोरांनी आम्हाला बेदम मारहाण करून रोकड घेऊन पळ काढल्याची तक्रार या दोघांनी आरे पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली. मात्र चौकशीत पोलिसांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची या दोघांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला. अखेर पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे या दोघांनी आपल्या दोन मित्रांसह हा चोरीचा बनाव रचला होता. पोलिसांनी त्यांचा तिसरा साथीदार प्रसाद याला जोगेश्वरीतील घरातून अटक केली आणि त्याच्या घरातून 9 लाख 40 हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या तिघा आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे, तसेच चौथ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे परिमंडळ 12 चे पोलीस आयुक्त किरण चव्हाण यांनी सांगितले.

Loading Comments