हार्बर मार्गावरून लोकलने प्रवास करतेवेळी चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध वडाळा रेल्वे पोलिसांनी लावला आहे. रविवारी 16 प्रवाशांना त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीची शहानिशा करून वडाळा रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी.सरोदे यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले आहेत.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजयसिंग गिरासे हे देखील उपस्थित होते. झटपट पैसे कमवायच्या धुंदीत प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारून अनेकदा मोबाईल चोर पळ काढतात आणि मोबाईल अगदी अल्प किंमतीत विकतात. यातून चोरांना झटपट पैसा मिळतो. त्यामुळे मोबाईल चोरीचे प्रकार रेल्वेमध्ये वाढू लागले आहेत. तर दुसरीकडे अल्प किंमतीत मोबाईल विकत मिळत असल्याने ग्राहक कोणताही विचार न करता मोबाईल विकत घेतात. वडाळा लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल ट्रेस केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसलेल्या दुकानदार आणि सामान्य नागरिकांकडे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कोणताही गुन्हा लोहमार्ग पोलिसांनी दाखल केला नसल्याचे सांगून तब्बल 1 लाख 69 हजार 698 रुपये किंमतीचे 16 मोबाईल ट्रेस करण्यात आले आहेत.