बँकेतल्या भुरट्या चोरांपासून सावधान ! नाहीतर असं होईल


बँकेतल्या भुरट्या चोरांपासून सावधान ! नाहीतर असं होईल
SHARES

बँकेतून फाटक्या नोटा येतात... नोटा मोजून घे असं सांगून नोटा मोजण्यासाठी मदत करण्याच्या बहाणाने कांदिवलीतल्या एका तरुणाची १२ हजार रुपयांची रक्कम तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी ही घटना घडली असून याप्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर हा चोरीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 


हातचलाखीने केली चोरी

कांदिवलीच्या चारकोप परिसरात संतोष भगत नावाचे गृहस्थ राहतात. शुक्रवारी दुपारी त्यांच्याजवळील ५० हजार रुपये बँक आॅफ बडोदाच्या कांदिवलीतील शाखेत भरण्यासाठी आले होते. त्यावेळी बँकेत संतोष यांच्या हातात मोठी रक्कम असल्याचं पाहून तीन आरोपींना त्यांना घेरले. एका मागोमाग एक तिघांनी नोटा तपासून घ्या, हल्ली खोट्या नोटा नागरिकांना दिल्या जात आहेत. तुमच्याकडे असलेल्या नोटांमध्ये खोटी नोट आढळली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी भीती त्यांनी संतोष यांना दाखवली. त्यामुळे संतोष हे त्यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपल्याजवळी पैसे त्या तिघांनी मोजण्यासाठी दिले. त्यावेळी या तिघांनी त्या एकूण रकमेतून १२ हजार रुपये काढून घेत तेथून पळ काढला. 


पोलिसांत केली तक्रार

पैसे मोजताना त्यात तफावत आढळल्यानंतर संतोष यांनी त्या तिघांना बँकेत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेही दिसून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संतोष यांनी पोलिस नियत्रंण कक्षाला कळवत चारकोप पोलिसांत तक्रार नोंदवली. बँकेचं सीसीटीव्ही पाहिल्यानंतर या आरोपींची ही खेळी लक्षात आली. पोलिस या भुरटया चोरांचा माग काढत असल्याचं चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा