परदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक

या आरोपींच्या चौकशीत त्यांनी आतापर्यंत २० वेळा दुबईला परदेशी चलन पाठवल्याचे कबूल केले आहे.

परदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक
SHARES

दोन कोटी रुपयांच्या परदेशी चलन तस्करीच्या प्रकरणात सीमा शुल्क विभागाने तिघांना अटक केली. हे तिघेही कुरिअर कंपनीशी संबंधित असून, यामागे हवाला रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.मुरलीधरन गोपाळ नायक, मनीष नायर व राजीव नायर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी आतापर्यंत २० वेळा दुबईला परदेशी चलन पाठवल्याचे कबूल केले आहे. 


. मुरलीधरन व मनीष हे अंधेरी येथील रहिवासी आहेत, तर राजीव ठाण्यात राहतो, अशी माहिती सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिली. कुरिअर टर्मिनसमधील दोन पार्सलमध्ये परदेशी चलन असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री तपासणी करण्यात आली. या पार्सलमध्ये स्टीलची भांडी, पोलाद, कपडे व चटई असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र स्टीलच्या डब्यात दोन लाख 88 हजार अमेरिकन डॉलर (सुमारे दोन कोटी सात लाख रुपये) सापडले. या पार्सलची नोंदणी बनावट नावांनी करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर कुरिअर कंपनीशी संबंधित असलेल्या या तिघांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मुंबई व संयुक्त अरब अमिराती येथील दलालांद्वारे हे व्यवहार होत असून, यापूर्वी किमान 20 वेळा दुबईला परदेशी चलन पाठवण्यात आल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले.


हवाला रॅकेटचा हात

या प्रकरणामागे हवाला रॅकेट असल्याचा संशय असून छुप्या मार्गाने पैशांची देवाण-घेवाण सुरू असल्याची शक्‍यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही रक्कम ज्या व्यक्तीची आहे, तिची ओळख पटली असून, शोध सुरू आहे. मुख्य आरोपी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून परदेशांत पैसे पाठवत आणि आणत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा