दारूसाठी तिघांनी केली मित्राची हत्या

राजूने पोलिसात तक्रार करण्याची भिती दाखवल्यानंतर त्या तिघांनी राजूला गाडीवर बसवत वाशी पुलावर नेले. त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा राजूच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत त्याला मारहाण केली.

दारूसाठी तिघांनी केली मित्राची हत्या
SHARES

दारू पिण्यासाठी मित्र पैसे देत नसल्याने तिघा जणांनी मित्राला मारहाण करत लुटले. मित्राने पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याचं सांगितल्यानंतर तिघांनी त्याला वाशी पुलाहून खाडीत फेकत त्याची हत्या केली. राजू गायकवाड असं मृत तरूणाचं नाव आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अविनाश उर्फ टप्पू ढिपले, कृष्णा उर्फ चाम्या राजू सुतारसह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या तिघांनी राजूने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.


चौघेही नशेत धुंद 

गोवंडीच्या घाटला परिसरात राजू गायकवाड कुटुंबियांसोबत राहत होता. २ डिसेंबर रोजी राजू त्याच्या आरोपी मित्रांसोबत गोवंडी रेल्वे स्थानकासमोरील बारमध्ये दारू पिण्यास बसले. चौघेही नशेत धुंद झाल्यानंतर बारमधून बाहेर पडले. मात्र अविनाश, कृष्णा आणि त्या अल्पवयीन आरोपीला आणखी दारू प्यायची होती. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे तिघांनी राजूकडे पैसे मागितले. मात्र राजूकडेही पैसे नव्हते. यातून त्यांचा राजूसोबत वाद झाला. यावेळी तिघांनी राजूच्या कानातील सोन्याची बाली खेचून त्याला मारहाण केली. 


वाशी खाडीत फेकले

राजूने पोलिसात तक्रार करण्याची भिती दाखवल्यानंतर त्या तिघांनी राजूला गाडीवर बसवत वाशी पुलावर नेले. त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा राजूच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत त्याला मारहाण केली. राजूने पोलिसात तक्रार नोंदवल्यास आपण अडचणीत येऊ या भितीने तिघांनी नशेत त्याला वाशी खाडीत फेकले.


अात्महत्येचा बनाव

राजू घरी न आल्याने ३ डिसेंबर रोजी राजूचा भाऊ विजय गायकवाड याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. कालांतराने हा गुन्हा वाशी पोलिसांनी गोवंडी पोलिसांकडे सुपूर्द केला. पोलिस राजूबाबत चौकशी करत असल्याची माहिती तिघांना मिळाल्यानंतर अविनाशने त्या रात्री राजूने वाशी खाडीत अचानक उडी टाकल्याचे पोलिसांना सांगितले. 


मृतदेह कुजला

पोलिसांना अविनाशवर संशय अाल्याने त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस राजूचा मृतदेह शोधत होते. मात्र, पोलिसांना मृतदेह आढळून आला नाही. पाच दिवसांनी राजूचा मृतदेह यलोगेट पोलिसांच्या हद्दीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा - 

संशयित खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी चालकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा