ड्रग्जची सवय लावण्यासाठी माफियांची अनोखी शक्कल

 Mumbai
ड्रग्जची सवय लावण्यासाठी माफियांची अनोखी शक्कल

ड्रग्ज स्मगलर हे नेहमी लोकांना ड्रग्जच्या व्यसनाधीन करण्याच्या मागे असतात. जेणेकरून त्यांचा धंदा कायम तेजीत राहील. कॉलेजचे विद्यार्थी हे नेहमीच त्यांच्या रडारवर असतात. पण या मुलांना व्यसन लावण्यासाठी या ड्रग्ज माफियांनी अशी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या ड्रग्ज स्मगलर्सनी चक्क ड्रग्स फुकटात वाटण्यास सुरुवात केली आहे. या ड्रग्जची मात्रा जरी अतिशय कमी असली तरी मुलांना व्यसन लावण्यासाठी ती पुरेशी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काही दिवसांपूर्वी वाडीबंदर परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 115 ग्रॅम कोकेन आणि 60 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. विशेष म्हणजे कोकेन हे पाच पाच ग्रॅमच्या छोट्या छोट्या पुड्यांमध्ये बांधण्यात आले होते. 

'चॉकलेटसारख्या दिसणाऱ्या या पुड्यांना लव्ह सिप किंवा लव्ह ड्रॉप असे म्हटले जात असून, हे लव्ह ड्रॉप स्मग्लर फुकटात वाटतात अशी माहिती आझाद मैदान युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भालेराव यांनी दिली. या पाच ग्रॅमच्या पाऊचमध्ये कोकेनची मात्रा ही 0.05 ग्रॅम असली तरीही ते ड्रग्ज तरुणांना व्यसनी करण्यासाठी पुरेसा असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेची सध्या धडक कारवाई सुरू असून, गेल्या काही दिवसांत तब्बल 14 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना गजाआड केले असून, कित्येक कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

Loading Comments