साहेब ओरडतील म्हणून... अग्निशमन दलाचा वाहनचालक 'नो एण्ट्री'त घुसला

अग्निशमन दलाची एक जीप भरधाव वेगात अॅन्टाॅप हिलमधील 'नो एण्ट्री'त घुसली. वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून या जीपला थांबवलं. 'नो एण्ट्री'त जीप घुसवण्याचं कारण विचारल्यावर साहेबाला आणण्यास उशीर होत असल्याने असं केल्याचं सांगताच पोलिसांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

साहेब ओरडतील म्हणून... अग्निशमन दलाचा वाहनचालक 'नो एण्ट्री'त घुसला
SHARES

मुंबईकरांचं आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर विसंबून असतं, असं म्हणतात, सकाळच्या सुमारास आॅफिसचं मस्टर गाठण्यासाठी घाईघाईने धावपळ करणारे किंवा गाडी चालवणारे अनेकजण आपण पाहतो. मात्र बुधवारी सकाळी अग्निशमन दलाची एक जीप भरधाव वेगात अॅन्टाॅप हिलमधील 'नो एण्ट्री'त घुसली. वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून या जीपला थांबवलं. 'नो एण्ट्री'त जीप घुसवण्याचं कारण विचारल्यावर साहेबाला आणण्यास उशीर होत असल्याने असं केल्याचं सांगताच पोलिसांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.


साहेबाला आणायला उशीर झाला

अॅन्टाॅप हिल येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात चालक म्हणून कामाला असलेले निझाममुल्ला फारकी बुधवारी सकाळी वरिष्ठांना आणण्यासाठी अॅन्टाॅप हिल इथून निघाले. उशीर झाल्यास साहेबांचा ओरडा पडेल, म्हणून निझाममुल्ला भरधाव वेगात सायरन वाजवत थेट 'नो एण्ट्री'त घुसले.


पाठलाग करून अडवलं

गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचं लक्ष वेगात 'नो एण्ट्री'तून जात असलेल्या अग्निशमन दलाच्या जीपवर पडलं. परिसरात काही आपत्कालीन घटना घडली आहे का? याची माहिती गस्तीवरील अधिकाऱ्यांनी वायरलेसवर घेतली. मात्र अशी कुठलीही घटना परिसरात घडली नसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जीपचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.


दंडात्मक कारवाई

इशारा देऊनही निझममुल्ला गाडी थांबवत नव्हते. अखेर सायन सिग्नलजवळील एका वळणावर पोलिसांनी निझाममुल्लाला ओव्हरटेक करत अडवलं. निझाममुल्लाला खाली उतरवून चौकशी केल्यावर वरिष्ठांना आणण्यास उशीर होत असल्याने वेगात गाडी चालवत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचेल, अशा प्रकारे गाडी चालवणे आणि वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.



हेही वाचा-

मैत्रीच्या नावाला काळिमा, मित्राचा मृतदेह भिकाऱ्यांमध्ये झोपवून काढला पळ

दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला उडवले, आरोपी अटकेत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा