गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गाड्यांकडून टोल घेतला जाणार नाही. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी, असे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज
SHARES

मुंबईसह कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड पहायला मिळत आहे.  गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गाड्यांकडून टोल घेतला जाणार नाही. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी, असे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.


विशेष बंदोबस्त

कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे अनेक चाकरमानी गावची वाट धरतात. एसटीच्या २२०० स्पेशल गाड्या, नियमित १५०० बसेस, ४ ते ५ हजार खासगी ट्रॅव्हल्स आणि १० हजारांपेक्षा जास्त खासगी वाहने (चारचाकी) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी प्रवास करणार आहेत.  त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल. ही वाहने ठाणे, नवी मुंबई,मुंबई, पालघर येथून निघणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात महामार्गांवर कोणातीही दुर्घटना किंवा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष बंदोबस्त महामार्गावर लावला आहे.


पर्यायी मार्ग 

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते, त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी यंदाही कोकणात जाण्यासाठी मुंबई-पुणे आणि पुणे-कोल्हापूर असा पर्यायी मार्ग सुचवला आहे. या पर्यायी मार्गामुळे अंतर जरी वाढत असले तरी वेळेची बचत होणार आहे. अनेक प्रवासी कोल्हापूरमार्गे जाऊन कोकणात जाण्यासाठी आंबाआंबोली, फोंडा, गगनबावडा मार्गाचा वापर करतात. यातील फोंडा घाटाचा जास्त वापर केला जात नाही. या मार्गावर देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


टोल पास 

मुंबईतून कोकणात किंवा इतर ठिकाणी गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांनी ते राहत असलेल्या स्थानिक परिसरातील वाहतूक पोलिस चौकीला भेट द्यावी. त्या ठिकाणी तुमचे ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवावे. तसंच मुंबईतून कुठे जाणार याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस त्या रस्त्याला येणाऱ्या टोल नाक्याची माहिती संघटीत करून तुम्हाला विनामुल्य पास देतील. 



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा