शाळेच्या नराधम 'ट्रस्टी'ला चिमुरडीने ओळखले

  Andheri west
  शाळेच्या नराधम 'ट्रस्टी'ला चिमुरडीने ओळखले
  मुंबई  -  

  अंधेरी पूर्वेकडील एका नामांकित शाळेत चिमुरडीवर 'ट्रस्टी'ने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाची व्याप्ती वाढतच चालली आहे. ज्या पद्धतीने शाळेतल्या एका शिक्षिकेने दोन मुलींना या 'ट्रस्टी'च्या कॅबिनमध्ये नेले, त्यावरून या 'ट्रस्टी'च्या लैंगिक शोषणाचे शिकार आणखीही विद्यार्थी झाले असतील, असा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळेच 'एमआयडीसी' पोलिसांनी शाळेच्या पालकांचे आणि शिक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पीडित मुलीनेही आरोपी 'ट्रस्टी'ला ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  या शाळेत नर्सरीमध्ये शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या विद्यार्थिनीच्या आईने गेल्या महिन्यात 'एमआयडीसी' पोलीस ठाण्यात मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. महिन्याभरापूर्वी मुलीच्या गुप्तांगावरील ओरखड्यासारख्या खुणा पाहून पीडित मुलीच्या आईने पीडित मुलीला यासंदर्भात विचारणा केली. मुलीने झालेला प्रकार कथन केल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर एका एनजीओच्या मदतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


  हेही वाचा - 

  अंधेरीत साडेतीन वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; ट्रस्टी, शिक्षिकेविरोधात गुन्हा


  शाळेच्या 'ट्रस्टी'नेच आपल्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. हा आरोपी 'ट्रस्टी' सध्या परदेशात असल्याने पोलिसांनी त्याचा फोटो पीडित मुलीला दाखवला. हा फोटो पाहून पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या 'ट्रस्टी'ला ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  यासंदर्भात 18 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आम्ही शिक्षकांचे आणि पालकांचे जबाब नोंदवून घेत असल्याची माहिती झोन 10 चे डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.