दंडाच्या नावाखाली क्लिन अप मार्शलांची वसूली, दोघांना अटक

मित्राने काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी दोघांना शिवाजीनगर परिसरातून केली अटक

दंडाच्या नावाखाली क्लिन अप मार्शलांची वसूली, दोघांना अटक
SHARES

मुंबईच्या पूर्व द्रूतगती मार्गावर दोन व्यक्तीनी क्लिन अप मार्शल असल्याचे सांगून एका दुचाकीस्वाराकडून सार्वजनिक ठिकाणी लगवी केल्याप्रकरणी ४०० रुपये उकळल्याची घटना ताजी असतानाच. मानखुर्द परिसरात तोंडावरील मास्क इंचभर खाली आले म्हणून दोन क्लिन अप मार्शलांनी एका व्यक्तीच्या खिशात हात घालून ५०० रुपये हिसकावून घेत पळ काढला. तक्रारदाराच्या मित्राने हा सर्व प्रकार मोबाइल कॅमेऱ्यावर कैद केल्यामुळे आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी या दोघांनाही अटक  केली असून सध्या ते पोलिस कोठडीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश चौगुले यांनी दिली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सुशांत प्रकरणात बिहार पोलिसांनी दखल देऊ नये – सुप्रीम कोर्ट

मानखुर्दच्या शिवाजी नगर परिसरात राहणारे तक्रारदार मोहम्मद कौसर अकबर शेख २७ यांचा टेलरचा व्यवसाय आहे. गुरूवारी सायंकाळी ते ७ च्या सुमारास मानखुर्दच्या टी जंक्शन परिसरात आपल्या पत्नीशी मोबाइलवर बोलत उभे होते. बोलताना शेख यांच्या तोंडावरील मास्क इंतभर खाली आले होते. हेच पाहून आरोपी रिझवान युसुफ शेख (३३), फिरोज रहिम शेख (३०) यांनी त्यांची वाट अडवत, तोडांवर मास्क न लावल्याचा आरोप करत जबरदस्ती त्यांच्या खिशात हात घालून ५०० रुपयांची नोंट काढून घेतली. दोघंही क्लिन अप मार्शलच्या ड्रेसवर नसल्यामुळे शेख यांनी त्यांच्याजवळ ओळखपत्राबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याच्यांतील एकाने शेख यांना धक्का मारला. शेख यांनी पोलिसांच्या १०० नंबर या नियंत्रण कक्षाला फोनकरून पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीला डोळ्याने खुनवल्यानंतर दोघांनी गाडीवरून पळ काढला. हा सर्व प्रकार शेख यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या मित्राने मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला.

हेही वाचाः- Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

या प्रकरणी शेख यांनी मानखुर्द पोलिसात तक्रार नोंदवली. मानखुर्द पोलिसांनी शेख यांच्या मित्राने काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी दोघांना शिवाजीनगर परिसरातून अटक केल्यानंतर या दोघांकडे पालिकेचे क्लिन अप मार्शलचे ओळखपत्र मिळून आले.  या दोघांनीही गुन्ह्यांची कबूली दिली असून मानखुर्द पोलिसांनी दोघांना भा.द.वि कलम ३९२,३२ अंतर्गत अटक केली असून सध्या दोघांही पोलिसांच्या कस्टडीत आहे. या दोघांनी अशा प्रकारे या पूर्वीही गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नसून त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा