SHARE

गुंतवणुकदारांचा चार हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रूप ऑफ कंपनीजच्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण भोंडवे (४७) व यतीन पालकर (५७) अशी दोघांची नावं आहेत. या गुंतवणूक योजनेतून देशभरातील ४० लाख गुंतवणूकदारांची ४ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या दोन्ही आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुण्यातून अटक केली.


४० लाख गुंतवणूकदारांची फसवणूक

गुंतवणूकदारांची सुमारे ४ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रूपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली या उद्योगसमूहाने देशभरातील ४० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व गोवा येथील कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यानंतर २०१५ मध्ये सेबीचे सहाय्यक सरव्यवस्थापक अंकित भन्साळी यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


१८ टक्क्यांचे अामीष

गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक १२ ते १८ टक्के नफा मिळवून देण्याचं आमीष या समूहाच्या गोव्यातील मे. साईप्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड (एसपीपीएल) व पुण्यातील साईप्रसाद फूडस लिमिटेड (एसपीएफएल) कंपनीकडून सभासदांना दाखविण्यात येत होते. प्रवीण भोंडवे व यतीन पालकर हे भापकरचे अत्यंत विश्वासू होते. दोघांनाही या योजनेतून कमिशनच्या नावाखाली सात ते आठ कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचा संशय आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने पाठवलेल्या अहवालानंतर दोघांना सहभाग निश्चित झाला. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


१९२ खाती गोठवली

भापकरने २००१ पासून साईप्रसाद ग्रूपसह अन्य संलग्न कंपन्यांची स्थापना करून देशभरातील ४० लाख सभासदांकडून ४ हजार कोटी जमा केले होते. मात्र रिझर्व्ह बॅंक तसेच सेबीकडून आवश्‍यक नोंदणी, व्यवहारासाठी परवानगी घेतली नसल्याचे तपासात उघड झाले आहे. कंपनीचे उत्पन्न, गुंतवणूक, मालमत्ता विचारात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वीकारलेल्या गुंतवणुकीची परतफेड ते करू शकत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत सेबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. या कारवाईअंतर्गत १५ विविध बॅंकांतील कंपनीची १९२ खाती गोठविण्यात आली आहेत.


३० ठिकाणी छापे

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सात राज्यातील ३० ठिकाणी छापे टाकले होते. या ठिकाणांवर कंपनीचे एजंट देशभरातील २०० ठिकाणांहून नागरिकांकडून दररोज पैसे जमा करायचे. याप्रकरणी यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ४० महागड्या कार जप्त केल्या अाहेत. याशिवाय मुख्य आरोपींनी सुमारे शंभर कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


हेही वाचा -

नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!

आता तरी सनातन संस्थेवर बंदी येणार का?

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या