'डी कंपनी'त फुट? अंडरवर्ल्डमध्ये भूकंप


'डी कंपनी'त फुट? अंडरवर्ल्डमध्ये भूकंप
SHARES

डी गँगमध्ये फुट पडल्याच्या वृत्ताने संपूर्ण अंडरवर्ल्डमध्ये सध्या भूकंप आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा राइट हँड समजला जाणारा छोटा शकील यांच्यात वाद झाल्यानं हे दोघेही वेगळे झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.


छोटा शकील डी कंपनीतून बाहेर?

भारतीय तपासयंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोटा शकीलनं डी कंपनीपासून फारकत घेतली असून दाऊदच्या क्लिफ्टन कराची येथील घरातूनही शकील बाहेर पडल्याचं समजतं.

डी कंपनीच्या सुरुवातीपासून छोटा शकील हा दाऊदचा सगळ्यात जवळचा साथीदार म्हणून ओळखला जातो. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटापासून ते रोजच्या सगळ्या कारवाया या छोटा शकीलच्या सांगण्यावरून करण्यात आल्या आहेत.


वादाचं कारण

दाऊद आणि छोटा शकील यांच्यातील वादाचं कारण दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम असून गेल्या काही काळापासून दाऊदच्या भावाचा गँगच्या एक्टिव्हिटीमध्ये सहभाग वाढल्यानं शकील नाराज असल्याचं समजतं. काही वेळा अनिसने डी कंपनीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय भारतीय तपास यंत्रणांना असून ही गोष्ट छोटा शकीलला खटकल्याचं सांगण्यात येत आहे.


आयएसआय हादरली

डी कंपनीमध्ये फुट पडल्याने आयएसआयदेखील हादरली आहे. त्यामुळे सध्या आयएसआय दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचं समजतं. डी कंपनीनं १९९३ साली मुंबईत साखळी स्फोट घडवून आणला होता. ज्यात शकीलचा मोठा वाटा होता. डी कंपनीत फुट पडल्याने भारताविरुद्ध ऑपेरशनवर परिणाम होण्याची भीती आयएसआयला आहे.

आजपर्यंत डी कंपनीच्या सगळ्या हस्तकांना छोटा शकील ऑर्डर देत आला होता. कंपनीत फुट पडल्यानंतर नेमके कोणाचे आदेश मानायचे असा प्रश्न हस्तकांना पडला. याआधी छोटा राजन, अबु सालेमसह अनेकांनी कंपनीला राम-राम ठोकत स्वतःचं गँग सुरू केलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा