मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला वांद्र्यातील मातोश्री बंगला बाॅम्बने उडवून देण्याची तसंच उद्धव ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे

मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला वांद्र्यातील मातोश्री बंगला बाॅम्बने उडवून देण्याची तसंच उद्धव ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद गँगचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. या फोननंतर मुंबई पोलिसांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. (unknown threatening call received from dubai to maharashtra cm uddhav thackeray matoshree residence)

वांद्रे पूर्वेकडील कलानगरमध्ये मातोश्री हा बंगला आहे. या बंगल्यावरील लँडलाइनवर धमकीचे ४ फोन काॅल करण्यात आले. हे चारही फोन काॅल दुबईतून करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. रविवार सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे धमकीचे कॉल आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. मातोश्री निवासस्थानी ड्युटीवर असलेल्या पोलीस ऑपरेटरने हे कॉल घेतले. धमकीचे फोन आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाला विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा नित्यनेमाने आढावा घेतला जातो. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढाव्यात दुबईहून मातोश्रीवर ३ ते ४ फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

या फोनची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. त्यानंतरच हा फोन कुणी केला, कशासाठी केला, फोन करणारी व्यक्ती खरंच दाऊद गँगची हस्तक आहे का, हे स्पष्ट होईल. मातोश्रीला धमकी देण्याची कुणाची आजवर हिंमत झाली नाही आणि अशी कुणी धमकी दिलीच तर तो पोलिसांच्या कचाट्यातून सुटणार नाही, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा