कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

 Kandivali East
कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

माणुसकीला काळिमा फासणारी घटना कांदिवलीतल्या पोईसरमध्ये घडली आहे. एका 30 वर्षाच्या व्यक्तीने आपल्याच शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या पोईसरमध्ये पाचवी आणि सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचा त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने लैंगिक छळ केल्याची घटना घडली. ही दोन्ही मुले जवळच्याच एका शाळेत शिकतात. बुधवारी दुपारी हे दोघेही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्राकडे गेले होते. तेव्हा तिथेच राहणाऱ्या 30 वर्षाच्या नराधमाने दोन्ही मुलांना एक-एक करून घरात बोलावले आणि दोघांसोबत लैंगिक अत्याचार करत ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली. पण मुले जेव्हा घरी गेली तेव्हा त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्या आई-वडिलांंनी त्यांना विचारले असता मुलांनी सुरुवातीला घाबरुन काहीच सांगितले नाही. पण आई-वडिलांनी मुलांना समजावल्यानंतर त्या मुलांनी त्यांच्यासोबत घडलेली सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर त्या मुलांच्या घरच्यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत असून मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे कांदिवलीचे पोलिस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.

Loading Comments