SHARE

वि.पी.मार्ग - तुम्हाला अचानक पोलिसी वेशातल्या व्यक्तीने हटकलं आणि तुमच्याकडच्या सोनं, चांदी किंवा रोकड अशा ऐवजाची मागणी केली तर मुंबईकरांनो सावधान! हे तोतया पोलीस असू शकतात. मुंबईत एकाच दिवशी तोतया पोलिसांच्या या टोळक्याने तिघांना अशाच प्रकारे लुटल्याचं समोर आलंय. या टोळक्याने आपण वी.पी.मार्ग पोलीस असल्याची बतावणी करत तीन मुंबईतल्या तीन व्यापाऱ्यांना लुटलंय.

पहिली घटना -

वि.पी.नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किसन धांगडे या व्यापाऱ्याला या बनावट पोलिसांनी गाठलं. धांगडेंकडचे दागिने बनावट असून ते तपासण्यासाठी द्या असं त्यांना सांगितलं. घाबरलेल्या किसन धांगडे यांनी आपल्याजवळची सोन्याची अंगठी(हिऱ्यासह 88सेंट) आणि 12.66 कॅरेटचा हिरा असा एकूण 5 लाख 17 हजार 247 रूपयांचा ऐवज या भामट्यांच्या हाती सोपवला. ऐवज हाती येताच या टोळक्यानं तिथून पोबारा केला.

दुसरी घटना -
अवजित कार्तिक या 29 वर्षीय तरूणाकडे हे चौघे आले आणि त्यालाही आपण पोलीस असल्याचं भासवलं. त्याच्याकडची सोन्याची अंगठी, सोन्याचं पेंडंट, नेकलेस सेट असं एकूण 122 ग्रॅम सोनं, ज्याची किंमत बाजारात 5 लाखांच्या घरात आहे, घेऊन हे बनावट पोलीस पसार झाले.

तिसरी घटना -
वि.पी.मार्ग परिसरात रहाणाऱ्या सुशांत घोष यांना या टोळक्यानं संध्याकाळच्या सुमारास गाठलं. पोलीस असल्याचा बनाव करत तपासणी केल्याचं भासवलं आणि सुशांत घोष यांच्याकडचा नेकलेस सेट, तब्बल 62 ग्रॅम वजनाचं सोन्याचं ब्रेसलेट आणि 8.5 कॅरेटचा डायमंड असा एकूण 8 लाखांचा ऐवज घेऊन हे भामटे गायब झाले.

एकाच दिवशी या तिन्ही घटना घडल्याने, गिरगाव परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी वि.पी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ याचा तपास करण्यास पोलिसांनी तीन पथकांची स्थापना केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या तिनही घटनांमधले आरोपी एकच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. स्थानिक पोलिसांना मदतीला घेत या तोतया पोलिसांच्या कर्नाटकातील नातेवाईकांच्या घरी पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यामध्ये तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मात्र, हे तोतया पोलीस अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या