इटालियन महिलेचा विस्ताराच्या विमानात ढिंगाणा, मुंबई पोलिसांनी..

महिलेने विमानात क्रू सदस्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर थुंकली तसेच वाद घातल्यानंतर तिने स्वतःचे कपडेही काढले, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

इटालियन महिलेचा विस्ताराच्या विमानात ढिंगाणा, मुंबई पोलिसांनी..
SHARES

अबु धाबी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या विस्ताराच्या विमानात अजब घटना घडली. ४५ वर्षीय एका महिलेने विमान हवेत असताना विमानात चांगलाच धिंगाणा घातला. क्रू सदस्यांनी या महिलेची तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने विमानात क्रू सदस्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर थुंकली तसेच वाद घातल्यानंतर तिने स्वतःचे कपडेही काढले, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाने पहाटे २ वाजून ३ मिनिटांनी अबू धाबीवरुन उड्डाण घेतले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. तक्रारदार क्रू सदस्य लबत खान ही पाच वर्षांपासून विस्तारा एअरलाईन्समध्ये नोकरी करत आहे.

खान यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले, “पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी इटालियन महिलेने तिला दिलेली बसण्याची जागा (सीट क्र. ‘११ सी’) सोडली आणि बिझनेस क्लासमध्ये जाऊन बसली. यानंतर क्रू सदस्यांनी तिला काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केली. मात्र आरोपी महिलेने क्रू सदस्यांकडे लक्षच दिले नाही. क्रू सदस्यांनी नम्रपणे तिला तिच्या इकॉनॉमीच्या जागेवर परतण्याची विनंती केली, मात्र त्या महिलेने दाद दिली नाही.”

यानंतर क्रू सदस्यांसोबत वाद घालत सदर महिलेने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. इतर क्रू सदस्य हस्तक्षेप करण्यासाठी आले असता इटालियन महिला त्यांच्या अंगावर थुंकली. “ती महिला खूपच त्वेषात आली होती. आम्ही तिला शांत होण्याचा सल्ला दिला. मात्र तिने सरळ तिचे कपडे काढून टाकले आणि विमानतच फिरू लागली.”, अशी माहिती दुसऱ्या एका क्रू सदस्याने दिली.

आज पहाटे ४.५३ वाजता विस्ताराचे अबू धाबीवरुन निघालेले विमान मुंबई विमानतळावर पोहोचले, तेव्हा वैमानिकाच्या सूचनेनुसार विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी सदर महिलेला ताब्यात घेतले. तिच्या पासपोर्टवरुन या महिलेचे नाव पाओला पेरुसिओ असल्याचे कळते.

सहार पोलीस स्थानकात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून विमान कायदा १९३७ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, या महिलेवर गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला कोर्टात हजर केल्यानंतर २५ हजारांचा दंड ठोठावून तिला जामीनावर सोडून देण्यात आले आहे.



हेही वाचा

चालत्या कारमधून तरूणाची स्टंटबाजी, पुढे जे झाले ते...

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा