धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराचा आरोप मागे

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला रेणू शर्मा हिने मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराचा आरोप मागे
SHARES

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला रेणू शर्मा हिने मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. यामुळे मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात (mumbai police) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे खुलासा करताना रेणू शर्मा यांची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीने संबंध ठेवल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. एवढंच नाही, तर या संबंधातून आम्हाला दोन मुलं असून त्यांना पालक म्हणून नाव दिल्याची तसंच पालनपोषणाचा सर्व भार उचलत असल्याची कबुलीही धनंजय मुंडे यांनी दिली होती. परंतु केवळ ब्लॅकमेल करण्यासाठीच रेणू शर्मा यांच्याकडून बलात्काराचा आरोप केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा- ‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण 

धनंजय मुंडे यांच्या या पोस्टनंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यातच भाजपचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ही महिला मला देखील याचप्रकारे अडकवू पहात होती, असं म्हणत आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केला. यानंतर या आरोपातील हवा निघून गेली.  

त्यानंतर रेणू शर्माने, मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा